देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

सांगली : पूरग्रस्त घरी पोचले तरी राज्य शासनाची मदत त्यांच्यापर्यंत पोचली नाही. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू, असा दिलासा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिला.

जिल्ह्यातील वाळवा, भिलवडी, अंकलखोप, ढवळी आणि सांगलीतील पूरबाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी आणि पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी फडणवीस आले होते. या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांच्यासमवेत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खा.संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, नीता केळकर, संग्रामसिंह देशमुख, ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदी सहभागी होते.

पूरग्रस्त भागात पाहणी करीत असताना त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सांगितले,की स्थलांतरित झालेले नागरिक घरी परतू लागले तरी अद्याप शासनाकडून काहीही मदत मिळालेली नाही. २०१९ मध्ये आलेल्या महापुरावेळी राज्य सरकारने प्रसंगी निकषामध्ये बदल करून बाधितांना तत्काळ मदत देण्याचे काम केले होते. केंद्र शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.

नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. अशा संकटाच्या काळात पूरग्रस्तांना सरकारने जास्तीत जास्त आणि लवकर मदत देण्याची गरज आहे. आम्ही विरोधकाची भूमिका योग्य पध्दतीने बजावून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यास सरकारला भाग पाडू. तसेच वारंवार येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीपासून सुटका करण्यासाठी बाधित क्षेत्रातील लोकांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन होणे गरजेचे असून यासाठी आम्ही आग्रही राहू असे, या वेळी फडणवीस यांनी सांगितले.