राज्यातील करोना आणि राजकीय परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. करोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करतानाच हे सरकार पाडण्यात भाजपाला रस नाही, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारकडून मिळालेल्या मदतीची यादीच वाचून दाखवली. ते म्हणाले, “केंद्र सरकारनं महाराष्ट्राला तीन महिन्यांच्या काळात २८ हजार १०४ कोटी रुपये दिले आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून अन्नदान्य देण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. त्यानंतर तीन महिन्यांच्या काळात केंद्रानं महाराष्ट्राला गहू, तांदूळ, डाळ आणि स्थलांतरित मजुरांच्या खर्चापोटी ४,५९२ कोटी रुपये दिले. औषधी, पीपीई किट्स, एन९५ मास्क याच्या खर्चासाठी ४६८ कोटी रुपये मदत दिली आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले. “राहुल गांधी यांचे आजचे विधान अतिशय गंभीर आहे. स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर सरकारची प्राथमिकता काय हे दिसून येईल. सध्या लढाई करोनाविरुद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वतःच्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या करोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत,” असं आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येविषयी भूमिका मांडली. दाट वसाहत असलेल्या ठिकाणी करोनाचा प्रसार जास्त होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. अस असलं तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी. आम्ही सरकारला सूचना करू शकतो. त्या स्वीकारायच्या की नाही हे सरकारवर अवलंबून आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.