माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबरोबर केलेल्या सत्तास्थापनेबाबत मोठा खुलासा केला आहे. शनिवारी एका खासगी वृत्तवाहिनीशी देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी महिनाभरात झालेल्या सत्तानाट्यावर वक्तव्य केलं.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना अजित पवार यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केले होते. मात्र, अवघ्या ८० तासांमध्ये कोसळले. या निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणं शक्य नाही. भाजपासोबतच सरकार स्थापन केलं पाहिजे, असं मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली,’ असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते,’ असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या दाव्यावर अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.