महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससंदर्भात घेतलेली भूमिका भाजपाच्या पथ्यावरच पडली आहे. शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसला जमीनदारीवरून सल्ला दिला आहे. मात्र, त्याच मुद्द्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका आणि त्यावरून भाजपाकडून केली जाणारी टीका येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकते.

काय म्हणाले होते शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस पक्षाविषयी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा कसा सांभाळावा हे समजत नाही. काँग्रेसनं आता स्वीकारावं की ते आता जमीनदार राहिलेले नाहीत, असा सल्ला काँग्रेसला दिल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले,  काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक  उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे, असे निरीक्षण पवारांनी नोंदविले.

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी!

“काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. आत्ता काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजरी तर गेली, पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचं वक्तव्य पवार साहेबांनी केलंय. ते काँग्रेसवर चपखलपणे लागू होतंय”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानाचा आधार घेऊन काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.

“सरकारलाही सुबुद्धी लाभू देत…”

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंदिरं न उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर देखील निशाणा साधला. “मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी आहे. आम्ही हिंदू आहोत. आमचे ३३ कोटी देव आहेत. जिथे आम्ही मानू, तिथे आमचे देव आहेत. पण या मंदिरांवर अवलंबून असणारे लाखो लोक आहेत. कुणी फुलं विकतं, कुणी उदबत्ती विकतं, कुणी प्रसाद विकतं, हळद-कुंकू विकतंय. मंदिरांवर अवलंबून असणारे पुजारी, सेवक आहेत. गेल्या दोन वर्षांत या लोकांची विदीर्ण अशी अवस्था झाली आहे. म्हणून आम्ही मागणी केली की मदिरालय सुरू होऊ शकतं, तर मंदिरं का सुरू होऊ शकत नाहीत? सोशल डिस्टन्सिंगचे नियम नक्कीच पाळले जावेत. देशभरात सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, फक्त महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत. त्यामुळे सगळ्यांना गणरायांनी सुबुद्धी द्यावी, तशी सुबुद्धी सरकारलाही लाभू देत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.