पाहणी दौऱ्यांचा सपाटा; मुख्यमंत्र्यांसह तब्बल २८ मंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा
सततच्या दुष्काळात होरपळून निघत असलेल्या मराठवाडय़ात मंत्र्यांकडून पाहणी दौऱ्यांचा सपाटा सुरूच आहे. आधी केलेल्या दौऱ्यांची काय फलनिष्पत्ती झाली याचा राजकीय हिशेब जुळत नसतानाच येत्या शुक्रवारी व शनिवारी दोन दिवस प्रामुख्याने बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ातील २८ तालुक्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसह तब्बल २८ मंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा होणार आहे. या दौऱ्यांमुळे प्रशासकीय यंत्रणेची मात्र चांगलीच कसरत सुरू आहे.
दुष्काळाची अधिक झळ बसलेल्या लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्य़ातील २८ तालुक्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसह २८ मंत्री ४ व ५ मार्चला पाहणी दौरा करणार आहेत. सर्व २८ मंत्र्यांच्या दौऱ्याचा तपशील या तिन्ही जिल्ह्य़ांच्या प्रशासनाकडे आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या निलंगा तालुक्यात दौरा करणार असून, शुक्रवारी सायंकाळी लातूर येथे बैठक घेणार असल्याचे येथे सांगण्यात आले. मंत्र्यांच्या दौऱ्यात महसूलमंत्र्यांचे मात्र नाव नाही.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (बीड), ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (गेवराई), शिक्षणमंत्री विनोद तावडे (उस्मानाबाद), उद्योगमंत्री सुभाष देसाई (परंडा), परिवहन मंत्री दिवाकर रावते (उमरगा), मंत्री रामदास कदम (औसा), जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (शिरूर अनंतपाळ), पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर (माजलगाव), मंत्री एकनाथ शिंदे (परळी), सहकारमंत्री चंद्रकांत पाटील (कळंब) आदी मंत्र्यांचा त्या त्या तालुक्यात दौरा होणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी अलीकडेच केलेल्या दौऱ्यात ग्रामीण भागातील दुष्काळी स्थिती भयावह होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मंत्री येतात व कोणाच्या तरी घरी सदिच्छा भेटी देत सत्कार स्वीकारून पुढे जातात, असा टोला त्यांनी मंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेता लगावला, तर पालकमंत्री रावते यांचीही त्यांनी ‘झेंडामंत्री’ अशी संभावना केली.
चव्हाण यांनी दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला, तेव्हा टंचाई निवारण कृती आराखडय़ातील कामे संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्य़ांना भेट देऊन परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मंत्रिमंडळ हलले. त्यामुळेच ४ व ५ मार्च रोजी भाजप व शिवसेनेचे जवळपास सर्व मंत्री बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. नांदेड व हिंगोली या दोन्ही जिल्ह्य़ांकडे मंत्रिमंडळाने दुर्लक्ष करावे, ही बाब दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसचे आमदार राजूरकर यांनी येथे केली.
जलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता मंत्री महाजन ४ मार्चला येणार नसल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला; पण दौरा रद्द नव्हे तर पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. नांदेडपेक्षा लातूर जिल्ह्य़ाची स्थिती गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना शिरूर अनंतपाळ येथे जाण्यास सांगितले, असे स्पष्ट करण्यात आले.

नांदेडबाबत दुजाभाव
दुष्काळ पाहणी दौऱ्याची लगीनघाई सुरू असतानाच दौऱ्यातही दुजाभावाचे दर्शन घडताना दिसत आहे. प्रामुख्याने नांदेडकरांना याची प्रचीती घडत आहे. नांदेड जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई तसेच दुष्काळी स्थितीची तीव्रता जाणून घेण्यासाठी आधी बबनराव लोणीकर व नंतर गिरीश महाजन या मंत्र्यांचे निश्चित झालेले दौरे रद्द झाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीही मराठवाडय़ाच्या दौऱ्यात नांदेडकडे पाठच फिरवली. नांदेडचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या दिवाकर रावते यांच्याकडे असून ग्रामीण भागातील पाणीटंचाई व दुष्काळी स्थितीबाबत ते गंभीर नसल्याची काँग्रेस पक्षाची तक्रार आहे. नांदेड व हिंगोलीचे खासदार काँग्रेसचे असल्याने या जिल्ह्य़ांकडे सापत्नभावाने बघितले जात असल्याचा आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी केला होता.