उत्तर महाराष्ट्रातील सभांमध्ये फडणवीस यांचा इशारा
धुळे / नंदुरबार : महाविकास आघाडीचे सरकार हे तीन तिघाडा काम बिघाडा, असे आहे. मोदी सरकारच्या योजनांच्या पैशांना आणि प्रकल्पांना या सरकारने विरोध केल्यास हे सरकार उलथवून टाकू, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसमधून टीका होत असतांना सत्तेसाठी लाचारी स्वीकारलेली शिवसेना मूग गिळून आहे. सत्तेसाठी शिवसेनेच्या वाघाची मांजर झाली असुन ती आता डरकाळीऐवजी दिल्लीच्या ‘मातोश्री’साठी म्यॉव म्यॉव करीत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांनी शुक्रवारी दौरा केला. यानिमित्त या दोन्ही जिल्ह्य़ात त्यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. त्यातही शिवसेनेवर त्यांनी सडकून टीकास्त्र सोडले. निवडणुकीत आमच्यासोबत मते मागितली आणि निवडणुकीनंतर संसार दुसऱ्यासोबत थाटला. आमच्या भरवशावर लढून शिवसेनेने बेईमानी करीत सरकार स्थापन केले. पण, बेईमानी करणारे सरकार टिकत नाही. मुख्यमंत्री बनण्याच्या हव्यासापोटी त्यांनी जनतेला धोका दिला. या सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करुनही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत काहीच मदत पोहचली नाही. विविध अटी-शर्तींची कर्जमाफी देवून शिवसेनेने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाविकास आघाडी सरकारचा अजूनही मंत्रिमंडळ घोळ सुरु आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे एवढे कैवारी आहेत तर मग शेतीवर आधारीत खाते तुमच्याकडे का घेत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.
मोदी सरकारच्या प्रकल्पांना येणारा पैसा हा केंद्राकडून येणार आहे. यामुळे राज्यात भाजपचे सरकार नसले तरीही प्रकल्पांची कामे थांबणार नाहीत. जर या सरकारने मोदी सरकारच्या प्रकल्पांना आणि येणाऱ्या पैशांना अडविण्याचा प्रयत्न किंवा विरोध केल्यास हे सरकारच उलथविण्यात येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
शिवसेनेचा वाघ आधी ‘मातोश्री’ मधूनच डरकाळ्या फोडायचा. आता या वाघाची मांजर झाली आहे. सावरकरांबाबत मध्य प्रदेशमधील काँग्रेसने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याचा उल्लेख करून फडणवीस यांनी सावरकरांवर टीका होत असतांना शिवसेना गप्प असल्याचा आरोप केला. आपण जर शिवसेनेच्या जागी असतो, तर सत्तेला लाथ मारून बाहेर पडलो असतो, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे कदमबांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
नरडाणा येथील सभेत राष्टवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे मुलगा यशवर्धन आणि शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये आले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 4, 2020 4:09 am