28 February 2021

News Flash

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला इशारा

मागील फडणवीस सरकारच्या अनेक योजनांचा आढावा घेऊन त्यातील अनेक योजना बंद करण्याची भुमिका महाविकास आघाडीच्या सरकारने घेतली आहे.

फडणवीस सरकारच्या अनेक योजनांचा आढावा घेऊन त्यातील अनेक योजना बंद करण्याचा निर्णय सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासाठी आमच्या सरकारने आणलेल्या पाणी योजना बंद करु नयेत. जर या योजना बंद झाल्या तर मोठी लढाई लढू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “मराठवाड्यात सर्वांत मोठा पाण्याचा प्रश्न आहे. यामध्ये सिंचनासाठी, पिण्यासाठीच्या पाण्याचा मोठा अनुशेष आहे. सिंचनासाठी पाणी नसल्याने इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. म्हणूनच आमचं सरकार आल्यानंतर मराठवाड्यावर आम्ही विशेष लक्ष दिलं. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. मात्र, यापूर्वीच्या आघाडी सरकारने मराठवाडाच्या हिश्याचं पाणी पळवून नेलं होतं. त्यामुळं कृष्णा मराठवाडा योजनेचं पाणी मराठवाड्याला मिळालं नाही.”

जनतेच्या मनातली ‘जलयुक्त शिवार योजना’ बंद करु नका

“उलट आमच्या सरकारने कृष्णा मराठवाडा योजनेसाठी ४००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे हे पाणी बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात येणार आहे. मात्र, ते या सरकारमुळं बंद होणार असल्याची शंका आम्हाला आहे. त्यामुळेच पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. मराठवाड्याचं हे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केल्यास मराठवाडा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला या योजनेचं श्रेय घ्यायचं असेल तर घ्या, त्याचं नाव बदलायचं असेल तर बदला पण जनतेच्या मनातली ‘जलयुक्त शिवार योजना’ बंद करु नका. ५ वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून मराठवाड्यात आम्ही पाणीक्रांती आणली. त्यामुळे ही योजना बंद केलीत तर मोठी लढाई लढू,” असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी सरकारला दिला.

आघाडी सरकारनं नवी धरणं बांधली नाहीत

“गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याला १०२ टीएमसी पाणी मिळालं होतं. मात्र, आघाडी सरकारने नवी धरणं बांधण्याला स्थगिती दिली. आघाडीच्या काळात मराठवाड्यावर अन्याय झाला. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 1:06 pm

Web Title: devendra fadnavis warns the government on water issue of marathwada aau 85
Next Stories
1 मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका – राज ठाकरे
2 …अन्यथा सरकारमधून बाहेर पडणार – अशोक चव्हाण
3 महाराष्ट्रातल्या या गावात तब्बल ६८ वर्षे भरतेय ‘गांधीबाबा यात्रा’
Just Now!
X