राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.

आणखी वाचा- …तरच भाजपाला राज ठाकरेंसोबत जाणं शक्य; फडणवीसांचा सूचक इशारा

२०१९च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी वेग घेतला होता. ऐनवेळी सत्ता वाटपाचं सूत्र न जुळल्यानं शिवसेना भाजपापासून दूर गेली. त्यानंतरही भाजपानं राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकार अल्पजीवी ठरलं. या नाट्यात देवेंद्र फडणवीस यांना सर्वकाही जुळवून येऊनही मुख्यमंत्री होता येत नसल्याची घटना फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. खुद्द फडणवीस यांनीच पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलाखती ही सल बोलून दाखवली.

आणखी वाचा- सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगच्या विषयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यावेळी मुख्यमंत्री झालो, साधारण मला कल्पना होती. मी कधीही बाहेर बोललो नाही. केंद्रीय नेतृत्वानं ती दिली होती. आनंद होता. पण दुसऱ्या कानाला कळू द्यायचं नाही. आमच्याकडे तशी पद्धत आहे. त्यामुळे माझा आनंद बाहेर दिसला नाही. बातमी कळल्यानंतर जो आनंद होतो, ती परिस्थिती कधी आली नाही. त्याबद्दल मी पत्नी व आईलाही सांगितलं नव्हतं. त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं मी मुख्यमंत्री होईल, तेव्हा मुख्यमंत्री झालो. जेव्हा माझ्यासहित सगळ्यांना माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार आहे, त्यावेळस मी झालो नाही. त्याच दुःख निश्चितच झालं. पण, फार काळ राहिलं नाही. माझ्यासाठी सगळं अविश्वसनीय होतं. त्यामुळे दोन दिवस विश्वास बसायला लागले. हे सरकार हातातून निसटत निसटत गेलं. सगळ्या गोष्टी आपल्या बाजूनं असताना, हे सरकार गेलं कसं, यामुळे माझा विश्वास बसत नव्हता. पण, नंतर परिस्थिती स्वीकारली”, असं फडणवीस म्हणाले.