महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी आपण दिलेला शब्द पाळत सरकारी रुग्णालयात उपचाराला प्राधान्य दिलं आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती किती गंभीर आहे हे फडणवीसांना आता समजलं असेल असं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण फडणवीस यांना स्वतःची काळजी घ्यायला सांगितल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वोत्तम उपचार होतील यासाठी डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत. आम्ही देवेंद्र फडणवीसांना सातत्याने त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगत होतो. आता त्यांना समजलं असेल की करोनामुळे बाहेर निर्माण झालेली परिस्थिती किती गंभीर आहे. विरोधी पक्ष मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही म्हणून त्यांच्यावर टीका करत होता. सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होऊन फडणवीस यांनी चांगला पायंडा पाडला आहे.” दसरा मेळाव्याबद्दल माहिती देत असताना राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या कामांमध्ये व्यस्त होते. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीसांनी मराठवाडा दौरा केला होता. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी करोनाची चाचणी करवून घेतली होती. शनिवारी या चाचणीचा अहवाल आला ज्यात फडणवीसांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.