राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी देवेंद्र फडणवीस उद्यापासून (११ जून) करणार आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळानं कोकणला तडाखा दिला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. उद्यापासून (११ जून) त्यांच्या कोकण दौऱ्याला सुरूवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे ११ आणि १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. ११ जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी ते भेटी देणार आहेत. त्यातनंतर १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचा दौरा केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींच्या मदतीचीही घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. काल (९ जून) रायगड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर आज (१० जून) रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पवारांनी पाहणी केली. यावेळी पवारांनी राज्याकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन कोकणवासीयांना दिलं.