भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी िहगोलीतील एका माजी आमदाराच्या निवासस्थानी भेट घेतली.  
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीदरम्यान उमेदवारांच्या नावांचीही चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान माजी आमदार व त्यांचे विश्वासू सहकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून िहगोली वगळता कळमनुरी व वसमत हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. विधानसभेसाठीच्या जागा वाढवून घेण्याचा विचार भाजपमध्ये सुरू असून कळमनुरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाटय़ाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद कमकुवत असल्याचे चित्र त्यांच्यासमोर मांडण्यात आले. जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला खाते उघडता आले नाही. नगर पालिकेच्या निवडणुकीत िहगोलीत दोन जागेवर समाधान मानावे लागले तर वसमत नगरपालिकेत शिवसेनेच्या ताकदीवर भाजपला सत्ता हस्तगत करता आली, तर कळमनुरीत हा पक्ष नाममात्रच ठरला आहे. फडणवीस हिंगोली येथे आल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही माहीत नव्हते. माजी आमदारांसमवेत झालेल्या चर्चेची माहिती नंतर काही जणांना कळाल्याने राजकीय गणिते नव्याने मांडली जात आहेत.