देवेंद्र शिरसाटला २३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी
किडनी तस्करी प्रकरणाला नवे वळण मिळत असून, किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी बनवाबनवी केल्याचे उघड झाले आहे. त्यादृष्टीने आता पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी देवेंद्र शिरसाट याला न्यायालयाने २३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अकोल्यात उघडकीस आलेल्या किडनी तस्करी प्रकरणाची पाळेमुळे अनेक ठिकाणी रुजली आहेत. देवानंद कोमलकर याची किडनी खरेदी करणारा नंदूरबार जिल्ह्य़ातील नवापूर येथील शिक्षक सुधाकर नाईक याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. देवानंद कोमलकर याला किडनी देण्यासाठी तयार करून, आरोपींनी त्याचे बनावट कागदपत्रे तयार केले. त्यानुसार त्याला अकोल्यातील रहिवासी न दाखविता, तो नंदूरबारचा रहिवासी असल्याचे दर्शविण्यात आले. किडनी देण्यासाठी त्याला तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांवर अकोला पोलीस अधीक्षकांच्या नावाचा असलेला शिक्का बनावट असल्याचे उघड झाले आहे. बनावट शिक्क्याचा वापर कुठे कुठे झाला, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, न्यायालयाने देवेंद्र शिरसाट याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्य़ाखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्याची गुरुवारी २३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. खदान पोलिसांचे एक पथक औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात किडनी देणाऱ्यांची तपासणी झाल्याची माहिती आहे. अन्य एका मोठय़ा खाजगी रुग्णालयातही पोलीस तपास करीत आहेत.
अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे दुसरे पथक मुख्य सूत्रधार शिवाजी कोळीला घेऊन मुंबई, पुणे येथे तपास करीत असल्याची माहिती आहे. शिवाजी कोळीने गरजू रुग्णांना किडनी देण्यासाठी त्यांचे मुंबई, पुणे येथे नातेवाईक असल्याचे बनावट दस्तावेज तयार करून किडनी प्रत्यारोपणाचे व्यवहार केले. या प्रकरणाचे मुंबईसह पुण्यातही धागेदोरे असल्याची माहिती समोर आली. औरंगाबादेतील एका मोठा रुग्णालयासह मुंबईतील तीन मोठय़ा रुग्णालयातही किडनी प्रत्यारोपणाचा प्रकार झाल्याची माहिती आहे.