News Flash

नवरात्रोत्सवात भाविकांना तुळजापुरात प्रवेशबंदी

मोजक्या पुजारी, महंत आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत प्रथेप्रमाणे धार्मिक विधी व पूजा केली जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शारदीय नवरात्रोत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र या काळात पायी चालत येणाऱ्या भाविकांवर बंदी घालण्यात आली असून यंदा तुळजापूर येथून राज्यातील विविध भागात ज्योत नेण्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.  मोजक्या पुजारी, महंत आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत प्रथेप्रमाणे धार्मिक विधी व पूजा केली जाणार आहे.

देशातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ अशी ओळख असलेल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपूर्वी राज्यभरातील शेकडो नवरात्रोत्सव मंडळ भवानीज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात. हलग्यांचा कडकडाट, कुंकवाची मुक्त उधळण आणि आई राजा उदोउदोचा गगनभेदी गजर अशा भक्तीमय वातावरणात हजारो तरुण तुळजापुरातून आपापल्या गावी भवानीज्योत घेऊन जातात. करोनाचा वाढता कहर, संक्रमित रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या आणि त्यामुळे वाढलेला मृत्यूचा टक्का प्रशासनासाठी सध्या मोठे आव्हान आहे. त्यामुळे यंदा भवानीज्योत घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळांवर  प्रतिबंध  घालण्यात आले आहेत.

घटस्थापनेनंतरही..  उस्मानाबाद, लातूर आणि परिसरातील जिल्ह्यंसह आंध्र आणि कर्नाटकातून घटस्थापनेनंतरही जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाला शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातून देखील हजारो भाविक तुळजापूरला पायी चालत येतात. जगदंबेला खेटा घालण्यासाठी मोठय़ा श्रध्देने चालत येणाऱ्या भाविकांना यंदा खेटा घालता येणार नाही. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने पायी येणाऱ्या भाविकांना तुळजापूर शहरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 12:23 am

Web Title: devotees barred from entering tuljapur during navratri festival abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रायगडमध्ये करोनामुक्तीचे प्रमाण ८९ टक्कय़ांवर
2 उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा – तांबे
3 संरक्षण साहित्य निर्मितीत नगरच्या उद्योजकांना संधी
Just Now!
X