भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी समजूत काढूनही प्रताप ढाकणे यांनी त्यांची ‘तटस्थता’ सोडली नाही. नगर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांच्या प्रचारात सहभागी न होण्याच्या भूमिकेवर ढाकणे ठाम असून तसे त्यांनी तावडे यांनाही स्पष्ट केल्याने पक्षातील खदखद कायम राहिल्याचेच स्पष्ट झाले. दरम्यान, ढाकणे यांची समजूत काढताना तावडे यांनी त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या उत्तर महाराष्ट्रातील दौ-यांच्या नियोजनाची जबाबदारी देऊ केली आहे.
तावडे यांनी शुक्रवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेसही ढाकणे यांनी अनुपस्थित राहणेच पसंत करून गांधी यांच्याशी असलेला असहयोग कायम असल्याचेच दाखवून दिले.
ढाकणे यांनी गांधी यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला असून पक्षाने त्यांची उमेदवारी न बदलल्यास त्यांना पाडण्याचा इशाराही त्यांनी जाहीरपणे दिला आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून तावडे येथे येऊन ढाकणे यांची समजूत काढणार अशी चर्चा होती. प्रत्यक्षात घाईघाईत शुक्रवारी नगरचा दौरा केला, मात्र त्यातही त्यांच्या हाताला फारसे काही न लागल्याने गांधी यांच्यासमोरील कटकटी वाढण्याचीच शक्यता व्यक्त होते.
तावडे आज सकाळी नगरला आले. पक्षाचे शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासह आमदार कर्डिले, खासदार गांधी, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार राम शिंदे व अन्य पदाधिका-यांशी चर्चा करून ते ढाकणे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. या सर्वामध्ये पुन्हा हॉटेलमध्ये चर्चा झाली. येथेही ढाकणे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे समजते. गांधी यांच्या प्रचारात आता आपण सक्रिय होऊ शकत नाही हे स्पष्ट करतानाच त्याची कारणेही त्यांनी पुन्हा विशद केली. पक्ष आपण सोडलेला नाही, सोडणार नाही, मात्र आपण या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत जिल्हय़ातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील धोरण ठरवू असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
दरम्यान, नंतर पत्रकार परिषदेत तावडे यांनी नगरमधील पक्षांतर्गत नाराजी काढण्यासाठीच आपण येथे आल्याचे सांगितले. ढाकणे यांच्यासह सर्व प्रमुखांशी आपली चर्चाही झाली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यावर सर्वाचे एकमत आहे. त्यासाठीच खासदारांना निवडून देण्याचे सर्वानी मान्य केले. ढाकणे यांचेही म्हणणे ऐकून घेतले, त्यांचीही दखल घेतली, आता कुठल्या अडचणी राहणार नाहीत असा आशावाद व्यक्त करतानाच ढाकणे यांच्यावर नेत्यांच्या दौ-यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. आगरकर, गांधी, कर्डिले, शिंदे यांच्यासह सुनील रामदासी, गौतम दीक्षित, गीता गिल्डा आदी या वेळी उपस्थित होते.
आमदारांची नाराजीच
तावडे यांनी हॉटेलच्या बंद खोलीत चर्चा करतानाही शिंदे, कर्डिले यांनी गांधी यांच्या प्रचार पद्धतीबाबत तक्रारी केल्याचे समजते. आमदारांना डावलून त्यांची स्वतंत्र यंत्रणा सध्या कार्यरत असल्याची तक्रार करून दोन्ही आमदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तावडे आज अनिल राठोड व विजय औटी या शिवसेनेच्याही आमदारांना भेटणार होते. मात्र या दोघांशी त्यांची भेट होऊ शकली नाही. राठोड बाहेरगावी होते, तर औटी यांनी दूरध्वनीवरच मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन तावडे यांना दिल्याचे समजते.