शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला गाळपाचा परवाना मिळावा यासाठी कारखान्याचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे उद्यापासून मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षां निवासस्थानी धरणे धरणार आहेत.
केवळ राजकीय हेतूने कारखान्याचा गाळप परवाना रोखण्यात आल्याचा आरोप ढाकणे यांनी केला. त्यांनी सांगितले, की कर्जाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र त्याला आपण विरोध केल्याने राज्य बँकेने आता औरंगाबाद येथील अंबावडीकर कंपनीला दहा वर्षांच्या कराराने कारखाना चालवण्यास दिला आहे. कारखान्याच्या व्यवस्थापनाने तीन महिन्यांपूर्वी साखर सहसंचालकांकडे रीतसर गाळपाचा प्रस्ताव दाखल करून परवानगी मागितली. मात्र केवळ राजकीय हेतूने अद्यापि ही परवानगी देण्यात आलेली नाही. साखर आयुक्तांच्या पातळीवरच याबाबत टाळाटाळ सुरू आहे.
कारखान्याच्या कामगारांचे नऊ महिन्यांचे पगारही थकले आहेत. ते द्यावेत यासाठी कारखान्याचे संस्थापक तथा माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनाच आंदोलन करावे लागले. त्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी लेव्हीची साखर उचलण्यासही विरोध केल्याने ढाकणे यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. कामगारांच्या पगाराबरोबरच कारखान्याला तातडीने गाळप परवाना मिळावा यासाठी तेही आंदोलनात उतरले, मात्र अद्यापि कारखान्याला परवाना देण्यात आलेला नाही. केवळ राजकीय हेतूनेच कारखान्याची कोंडी करण्यात आली असून, त्याच्या निषेधार्थ उद्यापासून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रताप ढाकणे यांनी सांगितले.
गाळप परवाना रोखून कारखान्याची विक्री करण्याचाच डाव असल्याचा आरोप ढाकणे यांनी केला. मात्र हा डाव आपण यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.