01 March 2021

News Flash

धामणी धरण अंधारात

पालघर जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील धामणी हे महत्त्वपूर्ण धरण आहे

वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने धामणी धरण परिसरातील विद्युत दिवे बंद आहेत.

देयके थकल्याने वीजपुरवठा खंडित; पाटबंधारे विभाग, महावितरण यांच्यात समन्वयाचा अभाव

विजय राऊत, कासा

वसई-विरार महापालिका, डहाणू व पालघर नगर परिषद, तारापूर औद्योगिक वसाहत आणि जिल्ह्य़ातील ग्रामणी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणाचा वीजपुरवठा गेल्या दीड महिन्यांपासून खंडित करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने नऊ लाखांचे वीजदेयक थकवल्याने वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे, मात्र वीजदेयक भरले असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. या दोन्ही विभागांच्या ढिसाळ कारभाराचा फटका धरणाला बसत असून वीजपुरवठा खंडित झाल्याने या धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

पालघर जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील धामणी हे महत्त्वपूर्ण धरण आहे. मात्र ३ जानेवारीपासून या धरणाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जानेवारी २०१६ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत धामणी धरणावरील विद्युत मीटर बंद होते. या काळाता मासिक ५० ते ५५ हजार रुपये वीजदेयक भरले आहे, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. मात्र महावितरणच्या म्हणण्यानुसार या कालावधीत नऊ लाख रुपयांची रक्कम थकीत असून ती भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले. पाटबंधारे विभागाला नोटीस बजावल्याचे महावितरणने सांगितले.

या धरणातून वसई-विरार महानगरपालिका, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसी, रिलायन्स थर्मल पॉवर, डहाणू व पालघर नगर परिषद आणि २६ गावे, दांडी व वानगाव या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. यातून पाटबंधारे विभागाला दरवर्षी साधारण १८ कोटींचा सिंचन महसूल मिळतो, तसेच शेती सिंचनातून वर्षांला तीन लाखांचा महसूल मिळतो. एवढे उत्पन्न मिळत असूनही थकीत वीज देयक भरू शकत नाही आणि सीसीटीव्ही दुरुस्त करू शकत नाही का, असा सवाल विचारले जात आहे. अभियंता नि. शां. दुसाने यांना याबाबत विचारणा केली असता त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षा धोक्यात

’ धरण परिसरात घडणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचे मोजमाप करण्यासाठी धरणक्षेत्रात सिस्मोमीटर बसवण्यात आले आहेत. मात्र वीजपुरवठय़ाअभावी ते बंद अवस्थेत आहेत.

’ धरणाच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले १३ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या एक ते दीड वर्षांपासूनच बंद अवस्थेत आहेत.

’ वीजपुरवठा खंडित झाल्याने धरण परिसरात रात्रीच्या वेळेत प्रचंड अंधार पडतो. या वेळी चोरी किंवा अन्य अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.

’ काश्मीर हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून धरण क्षेत्रात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. मात्र वीज नसल्याने अंधारात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास अडचणी येत आहेत.

९ लाखांचे देयक कसे?

जानेवारी २०१६ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत धामणी धरणावरील वीजमीटर बंद असल्याने पाटबंधारे विभाग वारंवार विद्युत मीटरची मागणी करत होता. परंतु महावितरण कंपनीने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. डिसेंबर २०१८ मध्ये नवीन वीजमीटर देण्यात आले. मात्र नवीन वीजमीटर देण्याबरोबरच नऊ लाखांचे सरासरी देयकही देण्यात आले. या देयकाच्या पूर्ततेसाठीच वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

भूकंपाची भीती

भूकंपाच्या वाढत्या घटनांमुळे  जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत. थकीत वीज देयकामुळे ३ जानेवारीपासून धामणी धरणाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. भूकंपाच्या पाश्र्वभूमीवर धरणक्षेत्रात भूकंपाचा एखादा जोरदार धक्का बसून अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे.

नादुरुस्त मीटरबाबत महावितरणला वारंवार कळवले होते, त्याशिवाय या कालावधीत अंदाजे ५० ते ५५ हजार वीजदेयक भरलेले होते. तरीही नऊ लाखांचे थकीत देयक दाखवले आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे.

– नि. शा. दुसाने, अभियंता, पाटबंधारे विभाग

काश्मीर हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षितता महत्त्वाची आहे. मात्र गेल्या एक ते दीड महिन्यांपासून वीजपुरवठा बंद असल्याने रात्री अंधारात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. धरणक्षेत्रातील वीजपुरवठा पूर्ववत होणे गरजेचे आहे.

– रामू जाधव, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:12 am

Web Title: dhamani dam electricity supply disconnect for last one and a half months
Next Stories
1 भोये गुरुजी नव्वदीतही कर्ममय
2 ‘ताटातुटी’नंतर आता एक व्हा रे!
3 राफेलच भूत भाजपाला गाडल्याशिवाय राहणार नाही – शरद पवार
Just Now!
X