17 October 2019

News Flash

रामदास कदम नव्हे, हे तर ‘दाम’दास कदम – धनंजय मुंडे

'ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, त्या शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले?'

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी रामदास कदम यांना ‘दाम’ दास कदम अशी उपमा देत टोला मारला. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, त्या शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले ? असा सवाल विचारताना शिवसेनेचा केंद्रात उद्योग मंत्री असताना कोकणात एकही प्रकल्प आला नाही. राज्यात त्यांच्याच उद्योग मंत्री असतांना त्यांचे काय उद्योग सुरू आहे, तर फक्त भूसंपादनातून शेतक-यांची अडवणूक आणि लूट सुरू असल्याचा घणाघाती हल्ला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशी खेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून जनतेला फसवणाऱ्या भाजपा सरकारला घरी बसवण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा आणि परिवर्तन घडवा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. जाहीर सभेच्या आधी खेड शहरात बैलगाडीतून अजितदादा पवार, सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी हाकण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले.

प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? : अजित पवार
निवडणुका आल्या की त्यांना प्रभू रामचंद्र आठवतात. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे, अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का ?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला विचारला आहे. हनुमानाची आज ‘जात’ काढली जात आहे, पण देवांच्या जाती कशाला काढता, असा सवालही त्यांनी भाजपाला विचारला आहे.

भाजपावाले पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाही: छगन भुजबळ
सध्या नावं बदलण्याचा जमाना आहे. आता पेट्रोलचेही नाव बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

First Published on January 11, 2019 5:27 pm

Web Title: dhanajay munde criticize ramdas kadam