राजकीय कौशल्य पणाला; मतदारांना भावनिक आवाहन

परळी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी मुंडे बहीण-भावांमध्ये चुरस आहे. गौरी-गणपतीमध्ये सजावटी स्पर्धा घेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी घरोघरी संपर्क साधला. त्यास त्यांच्या खासदार भगिनीची साथ होती. जनमत तयार करण्याच्या पंकजाताईंच्या या मोहिमेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले ते आर्ची आणि परशाच्या कार्यक्रमातून. सैराट चित्रपटातील कलाकारांना बोलावून त्यांनीही प्रचाराचा नारळ फोडला. आता या प्रचाराला धार आली आहे. परळी नगरपालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची न राहता ती मुंडे विरुद्ध मुंडे अशीच ठरू लागली आहे.

कौटुंबिक फाटाफुटीनंतर विरोधक बनलेल्या पंकजा आणि धनंजय या मुंडे या बहीण-भावाला एकाच वेळी प्रदेशस्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर दोन वर्षांतील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी परळी नगरपालिकेची सत्ता मिळवून राजकीय प्रतिष्ठा वाढवण्याचे तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासमोर पालिकेची सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने उमेदवार कोणीही असले तरी मुंडे बहीण-भावाच्या नेतृत्वाचा ‘कस’ लागणार आहे. त्यामुळे दोघांनीही शहरात तळ ठोकला आहे.

विधानसभा निवडणुकीत पंकजा यांनी विजय मिळवल्यानंतरही वैद्यनाथ कारखाना, वैद्यनाथ बँक, जिल्हा बँक या सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही आपले वर्चस्व कायम ठेवले. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असली तरी परळी पालिका मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याची खंत पंकजा यांनी अनेकदा व्यक्त केली. पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी गौरी-गणपती उत्सवापासून पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून घरोघरी संपर्कच सुरू केला. गौरी-गणपती उत्कृष्ट देखाव्याच्या स्पध्रेतून महिला वर्गाला आपल्याकडे जोडण्याचा प्रयत्न केला.

नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून असल्याने धनंजय मुंडे यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष सोमनाथ हालगे यांना राष्ट्रवादीत घेऊन भाजपला पहिला झटका दिला. पंकजा मुंडे यांनीही राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचे पक्षांतर घडवून जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादीने सरोजिनी हालगे तर भाजपने सुरेखा मेनकुदळे यांना मदानात उतरविले आहे. पंकजा मुंडे यांनी शिवसेना, रिपाइं, रासपा पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोट बांधून राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले. काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे आणि वैद्यनाथ देवल कमिटीचे राजेश देशमुख यांनीही आपले स्वतंत्र उमेदवार मदानात उतरविल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी शहरात तळ ठोकून प्रत्येक प्रभागात मजबूत यंत्रणा उभी केल्याने लढतीचे स्वरूप ‘मुंडे विरुद्ध मुंडे’ झाले आहे.