एक्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. दुष्काळाच्या प्रश्नावरुन धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरत टीका केली. दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही अशी टीका त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘दुष्काळाच्या प्रश्नावर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. सरकार दुष्काळावर काय उपाययोजना करतंय हे तर स्पष्ट सांगतच नाही पण कोर्टात साधी हजेरीही लावत नाही. इतके गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही. एग्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा’.

लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल जाहीर झाले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणार, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जागा २०१४ पेक्षा वाढतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पंतप्रधानपदावर विराजमान होण्याचे त्यांचे स्वप्न यंदा तरी पूर्ण होणार नाही, असे एक्झिट पोलमध्ये दिसते.

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज

रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

– रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
– रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

– टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

– इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

– एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

– आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८० एनडीए- २८७

– नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

– न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

– एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

– टुडेज चाणक्य: एनडीए- ३५०, यूपीए- ९५, अन्य ९७ (भाजपा – ३००, काँग्रेस- ५५)