मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

सध्या गल्ली ते दिल्ली गाजणारा नोदाबंदीचा विषय नगरपालिका निवडणूक प्रचारात विरोधकांनी उचलून धरला असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदींनी जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप जिल्ह्य़ातील पाचोरा येथे आयोजित प्रचार सभेत केला.

परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या नावावर १५ लाख रुपये टाकण्याची मोदींनी घोषणा केली होती. प्रत्यक्षात १५ रुपयेही जमा झाले नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी व गरिबांचा मेहनतीचा पैसा खात्यातून काढण्याची पंचाईत झाली आहे. ग्रामीण भागातील आर्थिक कणा असलेल्या सहकारी बँकांमधून पैसे काढणे व ठेवणे बंद केल्याने सर्वसामान्य जनता दिशाहीन झाली आहे, असे मुंडे यांनी नमूद केले.

राज्यात १५ वर्षे सेना-भाजप युती सत्तेत नव्हती. आता त्यांची स्थिती नवसाने झालेल्या मुलासारखी झाली आहे. त्यामुळे युती शासनातील ११ मंत्री अल्प काळातील सत्तेमुळे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले आहेत. या सरकारचा आपसात भांडणातच जास्त वेळ जातो. त्यामुळे जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसला तरीही फायद्याच्या गोष्टीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येतात. शिवसेनेला केवळ पाच मंत्रिपदे मिळाली तरी त्यांनी लाचारीने स्वीकारली. राज्यात कुणीही सुखी नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.