अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर हे अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांनी विधान परिषदेत गोंधळ घातल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे टाकले जात आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी मागणी मुंडे यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर झालेल्या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत अर्थसंकल्प मांडताना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तो थांबवण्यात आल्याचा आरोप केला. अर्थसंकल्प मांडत असताना पहिल्यांदाच त्यांना थांबवून प्रश्न विचारण्यात आला. तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशाराही दिला.