फक्त मतांसाठी पाकिस्तान विरुद्ध बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशप्रेम बेगडी असून त्यांना त्यांच्या सरकारने पाकिस्तानमधुन आणलेला कांदा आणि साखर कशी चालते? नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांना नाशिकमधील कांदा उत्पादक आणि देशातील साखर उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांची अधिक काळजी आणि प्रेम असावे, हेच त्यांचे देशप्रेम असावे असा टोलाही धनंजय मुंडेंनी यावेळी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत आज (गुरूवार) नांदेड, वसमत, परभणी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, तब्बल अडीच हजारहून अधिक पोलीस, सामान्य कार्यकर्त्यांची धरपकड, काळ्या कपड्यास बंदी, कांद्यास, शेतमालास, पिशव्या या सर्वांवर बंदी छावणीचे स्वरूप आले आहे नाशिकला आणि म्हणे सर्वात मोठ्या लोकशाही देशातील पंतप्रधानांचा दौरा आहे. मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला अशी उपरोधात्मक टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांशिवाय तुमची महाजनादेश यात्रा काढून दाखवा, असे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

याशिवाय, नाशिकला पंतप्रधान येऊन गेले, पुन्हा खोटं-नाटं प्रवचन देऊन गेले. मला असंख्य तरुणांनी मेसेज केले आहेत की विविध पक्षातील जवळपास ४ हजार कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. संपूर्ण यात्रेत फक्त धरपकड सुरू होती, जनतेत असंतोष आहे तो दडपणे हाच या महाजनादेश यात्रेचा उद्देश दिसून आला असे सांगत. मराठवाड्यात मला तरुणांच्या डोळ्यात निखारे दिसले. मला तरुणांवर विश्वास आहे. तरुणांच्या प्रश्नांसाठी पवार साहेब न थकता फिरत आहेत. ही तरुणाई नक्कीच साहेबांच्या पाठी भक्कम उभी राहणार असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवार यांनी एक संघर्ष सुरू केला आहे. हा संघर्ष पक्षासाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे. जेव्हापासून हा दौरा सुरू झाला आहे, तेव्हापासून मराठवाड्यात पावसाचे आगमन झाले आहे. साहेबांच्या संघर्षाला निसर्ग ही साथ देत असल्याचे सांगत, हा परिवर्तनाचा संकेत आहे असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाच्या माध्यमातून एक राजकीय भ्रष्टाचार सुरू केला असल्याची टीकाही त्यांनी केली.