मराठवाडा दुष्काळाने होरपळला आहे, निसर्गाचा कोप झाला आहे, अशावेळी जनतेसाठी तिजोरी रिकामी करण्याचं औदार्य हे सरकार का दाखवत नाही? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. जेव्हा जनता वेदनेत आयुष्य घालवत असते तेव्हा जनतेसाठी तिजोरी रिकामी करायची असते हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. हे सरकार फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेते पण त्यांच्या आदर्शावर चालत नाही असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

या सरकारने कायमच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे असल्या सरकारला बदललंच पाहिजे हा निर्धार या जनतेने केला आहे. या सरकारला सत्तेवरुन पायउतार करा असेही आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. कन्नड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये  लोकसभेत देशातील १२५ कोटी जनता बदल घडवेल असाही विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.
आज गरीब शेतकऱ्यांचा कुणीही वाली नाही. सरकारने कर्जमाफी दिली नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही कर्जमाफी करत छत्रपतींचा अपमान केला असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.या सभेला येण्यापूर्वी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले त्यानंतर हजरत जरजरी बक्ष दर्गात जावून चादर चढवली.

सभेत राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण यांनी आपले विचार मांडले. या सभेच्या सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील जाहीर सभेला माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण,आमदार विक्रम काळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान,सेवादल प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आदी नेत्यांसह कन्नड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.