पावसाअभावी शेतं जळून गेली आहेत. धरणं, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. दुबार पेरणीची शक्यता मावळली आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेला शेतकरी आत्महत्या करतो आहे. राज्यात अशी भीषण परिस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचतारांकित पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी उस्मानाबाद येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारपासून तीन दिवसांच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. धनंजय मुंडे हे देखील संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढवला.
मुंडे म्हणाले, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. परंतु, सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली. शेतकऱ्यांना दिलासा देणारा कुठलाही ठोस निर्णय सरकारकडून झाला नाही. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रस पक्ष पुन्हा एकदा रस्त्यावर आला आहे. सत्तेत असू दे किंवा नसू दे, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहोत. सत्तेत असताना शेतकऱ्यांना मदत केली आता विरोधात असतानाही मदत मिळवून देऊ.
राज्य सरकारमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांची बाजू मांडली जात नाही. ऐकली जात नाही. फडणवीस उद्योगपती, व्यापारी आणि धनदांडग्यांची बाजू घेतात. त्यांना शेतकऱ्यांबद्दल संवेदना नाही. शिवसेनेची स्थितीही अवघड आहे. शिवसेना सत्तेत राहून आमच्यावर टीका करते, परंतु, त्याऐवजी त्यांनी सत्तेचा उपयोग करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन मुंडे यांनी केले.