बीड : राज्य मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज प्रकाश सोळंके आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी म्हणून मुंबई येथे गेले होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीनंतर ते परत आले. चार वेळा निवडून येऊनही मंत्रिपद मिळत नाही आणि पहिल्यांदाच निवडून येणाऱ्या धनंजय मुंडेंना एवढे महत्त्व कसे, असा सवाल त्यांचे समर्थक उपस्थित करत होते. या पार्श्वभूमी वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्यानंतर मुंडे-सोळंके वादावर तूर्त पडदा पडला आहे. नेतृत्व ओबीसी समाजाकडे की मराठा समाजाकडे, असा सुप्त संघर्ष बीड जिल्ह्य़ात नेहमी असतो. त्यावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे.

‘आपल्यापेक्षा धनंजय यांचा पक्षाला जास्त उपयोग वाटत असेल’ असे सांगत सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार प्रकाश सोळंके हे आपल्याला वडील दिवंगत पंडितराव मुंडे यांच्याप्रमाणेच कायम मार्गदर्शक असून त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा मिळणार असल्याने जिल्ह्यच्या विकासासाठी आश्वासक कामगिरी करू.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद वाढणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आहे. दरम्यान, सोळंके यांनीही राजीनामा दिला नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांनी त्यांची समजूत घातली.

बीड जिल्ह्य़ामध्ये कायम मराठा आणि ओबीसी असा वाद रंगवला जातो. लोकसभा निवडणुकीतही प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा वाद चांगलाच चर्चेत होता. विशेषत: समाजमाध्यमावर याची अधिक चर्चा पसरवली जाते. दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असतानाही मराठा विरुद्ध ओबीसी असेच त्यांच्या निवडणुकीचे एकूणच चित्र असायचे.