राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे काही समर्थक उपवास करत आहेत, काहीजण नवस-पायी वाऱ्या करत आहेत, तर कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा समर्थकांना धनंजय मुंडे यांनी, “मित्रांनो, मी बरा आहे काळजी करू नका. कोणी कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका ही कळकळीची विनंती. तुम्हाला होणारा त्रास हा मला वेदना देणारा आहे”, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले आहे.

“मी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यातील काही जणांकडून विविध प्रकारे प्रार्थना केल्या जात आहेत, काहीजण उपवास करत आहेत, काहीजण नवस-पायी वाऱ्या करत आहेत, कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत; तुम्हा सर्वांचे माझ्यावरील ऋण वाढतच जात आहेत! पण सहकाऱ्यांनो, असे काहीही करू नका. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा-आशीर्वादाने मी ठणठणीत बरा होऊन येणार आहे. कोणीही पायी चालत जाणे, उपवास करणे असे काहीही करू नका. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला कसा बरा वाटेल? आपण सर्वांनी आहेत त्या ठिकाणी राहून स्वतःचे व कुटुंबाचे करोनापासून संरक्षण करावे, एकमेकांची काळजी घ्यावी, हेच माझ्यासाठी सदिच्छा व प्रार्थनांचं काम करतील.” अशी पोस्ट फेसबुकवर धनंजय मुंडे यांनी शेअर केली आहे.

दरम्यान, मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. धनंजय मुंडे हे करोनाची बाधा होणारे राज्य सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. यामध्ये त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी आणि बीडच्या वाहन चालकाचा समावेश आहे.