26 January 2021

News Flash

“…पण गेंड्याच्या कातडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधी पक्ष असलेला भाजपा आक्रमक झाला आहे. रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांचा हवाला देत भाजपानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडे केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून मुंडे आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं बलात्काराचा आरोप केले आहेत. या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे सदरील महिलेनं तक्रार केली आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपानं आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा- धनंजय मुडेंवर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

“सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटतं नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आणखी वाचा- मुंडे प्रकरण: पत्नी-मुलांची माहिती लपवणं आणि निवडणूक आयोग; जाणून घ्या कायदा काय सांगतो

आणखी वाचा- धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

“राजीनामा घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार…”

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध ११ जानेवारी रोजी रेणू अशोक शर्मा या महिलेनं ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करून कबूल केलं आहे की, ‘करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांवर या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून, स्वीकृती दिलेली आहे. सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.’ सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी, असा इशाराही उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 4:48 pm

Web Title: dhananjay munde rape allegation dhananjay munde renu sharma chandrakant patil demand resignation bmh 90
Next Stories
1 मुंडे प्रकरण: पत्नी-मुलांची माहिती लपवणं आणि निवडणूक आयोग; जाणून घ्या कायदा काय सांगतो
2 हे मृत्यू अत्यंत क्लेशदायक; राज्यपालांनी व्यक्त केली हळहळ
3 महाराष्ट्राला लसीचे कमी डोस मिळाले; राजेश टोपेंचा केंद्रावर गंभीर आरोप
Just Now!
X