“उदयनराजे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, याचं मला फार फार वाईट वाटलं. काल शरद पवार यांच्यासोबत उदयनराजेंची बैठक झाली. त्या बैठकीत महाराज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या प्रश्नांबाबत अत्यंत निराश होते. भाजपाविषयी ते जे काही बोलत होते. त्यानंतर ते भाजपात जातील असं वाटलं नव्हतं. जीएसटी, मंदी, बेरोजगारी या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. हे सरकार चांगलं काम करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र संध्याकाळी काय घडलं ते माहित नाही. उदयनराजे भोसले यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी का घेतला? ते माहित नाही. रयतेची काळजी असलेले राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढू”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधव यांच्यावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. “भास्कर जाधव २०१३ मध्ये विचारत होते ठाकरेंचा व्यवसाय नाही मग त्यांचं उत्पन्न इतकं कसं? आज भास्कर जाधव यांना उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला पवारसाहेबांनी पद दिलं, सगळं दिलं. लोकांचा विकास तुम्ही केला नाहीत ही तुमची चूक की पक्षाची? ” असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला.

“भाजपाने आमच्या पक्षातील नेत्यांवर टीका केली, त्यांची बदनामी केली आणि आता त्यांना पक्षात घेतलं. एकनाथ खडसेंवर आरोप झाल्यापासून ते राजीनामा मंजूर होईपर्यंत सोशल मीडियाचा वापर करुन त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर चित्र उभं केलं गेलं. मुख्यमंत्री दर महिन्याला २५ कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च करत आहेत.” असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी हे आरोप केले आहेत.

“उदयनराजे यांना मी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी आमच्या एका मित्राकडे निरोप पाठवला की मला संपर्क साधू नका मी भाजपात जातो आहे. हे सरकार राजकीय भ्रष्टाचार करतं आहे. मधुकर पिचड यांच्या दुसऱ्या पत्नीचं समृद्धी महामार्गामध्ये जमिनीचं प्रकरण होतं. त्याप्रकरणी कारवाई करायची की भाजपात येता? असं पिचड यांना विचारण्यात आलं मग त्यांनी भाजपात प्रवेश केला”, असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला.