News Flash

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन

मंत्रीपदावरील व्यक्तीच्या अशा वर्तनाने समाजाला काय संदेश जातो याचा सरकारने विचार करण्याचा सल्ला

सामाजिक न्याय यासारखे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असे इशारा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी दिला.

भाजपा महिला मोर्चाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सामाजिक न्याय सारखे मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे, याचा विचार करावाच लागणार आहे. मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड ती महिला करत आहे. मुंडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता व या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे.

एकीकडे स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्तीसारखा कायदा केला जातोय. मात्र दुसरीकडे राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांवर महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार केली जात आहे. या तक्रारीची कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये, याचीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे सांगत मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील, असेही खापरे यांनी या पत्रकात स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 9:10 am

Web Title: dhananjay munde renu sharma rape case bjp women wing to protest statewide for ministry resignation vjb 91
Next Stories
1 लसीकरण स्थगित केल्याचं ‘ते’ वृत्त चुकीचं; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण
2 …पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत; संजय राऊतांचा काँग्रेसला चिमटा
3 राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; दिवसभरात ६४ टक्के जणांनी घेतली लस
Just Now!
X