हिंदवी स्वराज्याची लढाई, आणि मनुस्मृतीची दुसरी लढाई ही रायगडात महाड येथून सुरू झाली आणि म्हणूनच दिल्लीसह राज्यातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी ही लढाई रायगडातूनच परिवर्तन यात्रेतून सुरू केली असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. येणाऱ्या निवडणुकीत यापुढे डिजिटल बॅनरवर फक्त एकच दिसेल अब की बार मोदी की हार…असा परिवर्तनाचा नारा कर्जत मधील सभेत धनंजय मुंडे यांनी दिला.

मागील चार वर्षातील मोदींचे भाषण त्यांना पुन्हा ऐकवले तर ते पुन्हा प्रचारालाच उतरणार नाहीत अशी परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाली आहे. मोदींची भाषणे ही चेष्टाचा विषय बनला असल्याची टीकाही धनंजय मुंडे यांनी केली. महागाईवर भाष्य करताना धनंजय मुंडे यांनी भाजपच्या 2014 च्या निवडणूकीत केलेल्या जाहिरातींचा दाखला देत टीकास्त्र सोडलं.

बेरोजगारीच्या बाबतीत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की,  मोदी सरकारने तरुणांना फक्त खोटी आश्वासनेच दिली. 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार असल्याची घोषणा मोदींनी केली होती मात्र चार वर्षात किती बेरोजगारांना नोकऱ्या लागल्या त्याचा हिशोब मागण्याची वेळ आली आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

सभेत नवाब मलिक, चित्रा वाघ यांनी आपले विचार व्यक्त केले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार सुरेश लाड, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.