परळी शहरात कामानिमित्त येणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांना आता केवळ 10 रूपयात जेवण मिळणार आहे. हा उपक्रम नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवला जाणार आहे. स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी भोजनालयाचे उदघाटन स्वातंत्रदिनी धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. परळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हे भोजनालय सुरु करण्यात आले आहे.

परळीत धान्य खरेदी, विक्री, शेतीविषयक व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना या भोजन गृहात 10 रूपयांमध्ये जेवणाचा लाभ घेता येणार आहे. दुष्काळ परिस्थितीत आर्थिक द़ृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना परळीत आल्यानंतर अल्प दरात जेवण मिळवून त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात जेवणासाठी येणार्‍या खर्चापैकी शेतकर्‍यांकडून फक्त 10 रूपये तर उर्वरित खर्च नाथ प्रतिष्ठान करणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे यांनी हा सामाजिक उपक्रम सुरु केल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दुष्काळात आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना परळीत कामानिमित्त आल्यावर अल्प दारात जेवण भेटावं त्यांना आधार मिळावा हा उद्देश असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.  आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी काम करणाऱ्या स्व.पंडीतअण्णा मुंडेंच्या स्मृती या योजनेच्या माध्यमातून कायम ठेवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.