राज्यातील सत्ता आमच्याकडे सोपवा, कोल्हापूरसह महाराष्ट्र टोलमुक्त करतो असे आश्वासन भाजपने निवडणुकीपूर्वी दिले होते. परंतु सत्तेवर आल्यानंतर टोलबाबत भाजपने दिलेले वचन न पाळता घूमजाव केले. कोल्हापूरवासीयांना टोलप्रश्नी भाजप सरकारने फसवले आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
धनंजय मुंडे म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जातात, पण त्या पाळल्या जात नाहीत. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर कोल्हापूरसह महाराष्ट्र टोलमुक्त करू असे आश्वासन अनेक नेत्यांनी दिले होते. तेच नेते आता सत्तेत असूनही टोल बंद करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत. म्हणूनच कोल्हापूरचा टोल बंद करू असे आश्वासन देऊन भाजपने कोल्हापूरकरांचा विश्वासघात करत फसवणूक केली आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच कोल्हापूरच्या टोलप्रश्नी वेळोवेळी विधान परिषदेत आवाज उठवू, प्रसंगी प्रश्न न सुटल्यास आंदोलनासाठी रस्त्यावरही उतरू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सोमवारी अहमदनगर येथील भगवानगडावर दर्शनासाठी जातेवेळी माझ्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असून, भगवानगडावरील दगडफेकीचा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. भगवानगड हा कोणा एका कुटुंबाची मालमत्ता नाही. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच श्री भगवानबाबांच्या दर्शनासाठी मी जात होतो. माझ्या दौऱ्याबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना देण्यात आली होती. परंतु गडावर जाताच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित कट असून भगवानबाबांचा गड हा आता भाजपचा राजकीय अड्डा बनत चालल्याचा आरोपही मुंडे यांनी या वेळी केला. भगवानगडावर झालेल्या दगडफेकीच्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
भाजपवर विश्वास ठेवत लोकांनी निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२२ जागा दिल्या. भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली, परंतु तीन महिन्यांतील कामकाज पाहता त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला असल्याची टीकाही त्यांनी केली. भाजपच्या कामकाजाबाबत समाधानी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.