विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनंजय मुंडे यांचे नाव निश्चित केले आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधीमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी सोमवारी विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला. स्वतः तटकरे यांनीच ही माहिती दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसारच विधान परिषदेतील या पदासाठी मुंडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर विरोधी पक्षाची जागा रिक्त असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने या पदावर दावा करण्याचे निश्चित केले आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीकडे ४१ सदस्य असले तरी आमदार रवी राणा, गणपतराव देशमुख, जितेंद्र ठाकूर तीन सदस्यांविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे तीनही आमदार आमच्याकडे असल्यामुळे आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. या तीनही सदस्यांचे स्वाक्षरी असलेले निवेदन सोमवारी सभापतींना देऊन दावा करणार आहे. काँग्रेसने दावा केला असला तरी त्यांच्याकडे संख्याबळ नसल्याचे अजित पवार रविवारी म्हणाले होते.