24 November 2020

News Flash

“भाजपाला हल्ली ‘जय’ आणि ‘नाथ’ चालत नाहीत”; धनंजय मुंडेंचा टोला

"सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपा विरोधी पक्ष हीच लोकशाहीची ताकद"

धनंजय मुंडे (संग्रहित)

भाजपाला धनंजय, जयसिंग यांच्यातील ‘जय’ आजकाल चालत नाही. त्यांना गोपीनाथ, एकनाथ यांच्यातील ‘नाथ’ही चालले नाहीत. त्यामुळेच आता भाजपाला प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

“५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री, ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री आणि सर्वाधिक १०५ आमदार असलेला भाजपा विरोधी पक्षात ही लोकशाहीची ताकद आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साऱ्यांना लोकशाहीची ताकद दाखवून दिली आणि भाजपा नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला. त्यामुळे पराभूत मानसिकतेने भाजपा पदवीधरची निवडणूक लढवत आहे”, असे टोला त्यांनी भाजपाला लगावला.

भाजपाला नुकतीच सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनीही मंचावर येऊन आपल्या भाषणातून आपल्या व्यथा मांडल्या. गायकवाड यांनी भाजपाने अनेक वर्ष आपल्यावर अन्याय केल्याचं त्यांनी सांगितलं. “भाजपा आता पूर्वीसारखी उरली नाही. नव्याने आलेल्या नेत्यांनी मला राजकारण शिकवू नये. मी लवकरच माझ्या मूळ घरी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे”, असे त्यांनी जाहीर केले.

“मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढण्याआधीच भाजपा पराभूत मानसिकतेत असून ३५ उमेदवार रिंगणात असताना आपल्यातील बंडाळी शमवण्यापेक्षा भाजपा नेतृत्वांनी सतीश चव्हाण या नावाचे उमेदवार उभे करून आपली शक्ती क्षीण झाल्याचे सिद्ध केले आहे. अशा कृतीला सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून उत्तर द्यावे”, असे आवाहन मुंडे यांनी केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 7:32 pm

Web Title: dhananjay mundhe slams bjp devendra fadnavis chandrakant patil state level leaders hails sharad pawar for mva government vjb 91
Next Stories
1 कौतुकास्पद! स्थलांतरित मुलांसाठी रस्त्यावरच भरते शाळा
2 आदित्य ठाकरे म्हणतात, “शिवसेनेसाठी राजकारण हे केवळ…”
3 कोल्हापूरच्या सुपुत्राला पाकिस्तानच्या गोळीबारात वीरमरण; सुप्रिया सुळे यांनी केलं ट्विट
Just Now!
X