पोलिस जखमी, अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात धनगर समाजासाठी आरक्षणाची मागणी

कर्जत :  अहल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या चौंडी या जन्मगावी आज, गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. धनगर समजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांवर लाठीमार करून पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनीही पोलीस व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडला. श्रीमती महाजन यांनाच माइकचा ताबा घेत शांततेचे आवाहन करावे लागले.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चौंडी या त्यांच्या जन्मगावी धनगर समाज दर्शनासाठी येतो, जाहीर सभा होते. पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या आजच्या कार्यक्रमावर राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाचे सावट होते. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडेसह अनेक जण उपस्थित राहिले नाहीत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख होते. खा. विकास महात्मे, माजी मंत्री आण्णा डांगे, आ. रामहरी रूपनर, आ. भारणे, आ. नारायण जगताप व आ. शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते.

धनगर समजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनीही तेथेच सभा आयोजित केल्याने गोंधळ होणार, याचा अंदाज वर्तवला जात होता. त्यामुळे डॉ. भिसे यांच्यासह रवी देशमुख (उमरापूर, ता. गेवराई) व सूर्यकांत काबंळे (वरूड, ता. भूम) यांना नगर जिल्हाबंदीच्या नोटीसा पोलिसांनी बजावल्या होत्या. दोन सभांमुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त शीघ्र व धडक कृतीदलासह तैनात केला होता. परिणामी चौंडीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. नगर-सोलापूर रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून चापडगावजवळ तपासणी केली जात होती. दुपारी दोनच्या सुमाराला श्रीमती महाजन यांचे आगमन झाल्यावर सभा सुरू झाली, सभेच्या परिसरास पोलिसांनी वेढा दिला होता. कार्यक्रम सुरू होताच काही अंतरावर पोलिस आणि कार्यकर्त्यांत बाचाबाची सुरू झाली. सभेतील लोक उठून उभे राहिल्याने गोंधळ वाढला. दरम्यान पोलिसांनी सनी विश्वासराव देवकाते आणि त्यांच्या समर्थकांना कार्यक्रमास येण्यास रोखले, कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची झाली. पोलिसांनी लाठीमार करत कार्यकर्त्यांना झोडपून काढले, या गोंधळात सभा सुरूच होती. पालकमंत्री शिंदे यांनी गोंधळ घालणाऱ्यांनी निघून जावे, असे आवाहन केले. राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना जिल्हाबंदी असलेले डॉ. इंद्रकुमार भिसे, सूर्यकांत काबंळे यांनी ‘धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा घोषणा काही अंतरावर सुरू केल्या, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. डॉ. भिसे यांना पकडण्यासाठी पोलिस धावले, त्यांच्यात झटापटही झाली. पोलिसांनी त्यांना लाठीमार करत त्यांना बाहेर घेऊन जाताना प्रचंड  गोंधळ झाला. अनेक कार्यकर्ते पोलिसांपुढे आडवे पडल्याने पोलिसांनी पुन्हा लाठीमार केला व भिसे यांना पोलिस वाहनात कोंडले, त्यांना तेथून घेऊन जाताना कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यास दगड लागल्याने तो जखमी झाला.  या वेळी सुमित्रा महाजन यांनी माइकचा ताबा घेत सर्वाना शांत राखण्याचे आवाहन केले. काही वेळानंतर सभा शांततेने पार पडली.

आरक्षणासाठी प्रदर्शन नको – महाजन

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, आरक्षण मिळणे व मागणे हा सर्वाचा अधिकार आहे, मात्र त्याचे असे प्रदशर्न नको. आपला आरक्षणास विरोध नाही मात्र आरक्षणाचे प्रदर्शन असे करू नका, अभ्यास करून आरक्षण मागितले पाहिजे. लोकसभेमध्ये आरक्षणावर निर्णय होणार आहे, चौंडी येथे पत्रके भिरकावून काही होणार नाही. देशातील प्रत्येक महापुरुषाला त्या-त्या समाजामध्ये नागरिकांनी बांधून ठेवले आहे, असे करू नका. ही सर्व थोर मंडळी सर्व जातिधर्माची आहेत. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. चौडी या छोटय़ाशा गावी जन्मलेल्या अहल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे स्मरण करा, अनुकरण करा.