डहाणू : डहाणू शहरात सागर नाका येथे रहदारीच्या रस्त्याच्या मुख्य रस्त्यावरील तात्पुरती पोलीस चौकी हटवण्यात यावी अन्यथा मोर्चा काढण्याचा डहाणू नगर परिषदेला इशारावजा निवेदन माकपच्या जिल्हा कमिटीने दिल्यानंतर सोमवारी रात्री चौकी हटवण्यात आली. करोनाकाळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी सागर नाका येथे तात्पुरती पोलीस चौकी बांधली होती. मात्र त्यामुळे मुख्य रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याबाबत नगर परिषदेला तक्रार केली होती. मात्र माकपच्या इशाऱ्यानंतर एकच दिवसात चौकी हटवून रस्ता मोकळा झाल्याने डहाणूकरांकडून आनंद व्यक्त होत आहे.

डहाणू नगर परिषद क्षेत्रात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यात ठोस उपाय योजले जात नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. दरम्यान सागर नाका येथून डहाणू शहरातून बाहेर जाण्यासाठी सागर नाका म्हणजेच तारपा चौक येथे वाहने वळवावी लागतात.

डहाणू शहरातील या मुख्य रस्त्यावर डहाणू पोलिसांनी तात्पुरती चौकी उभारली होती. त्यामुळे रहदारीसाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते, तर पोलिसांकडून जाता-येता दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना थांबवून अडवणूक केली जात होती. त्यामुळे डहाणूकर त्रस्त झाले होते. त्यामुळे माक्र्सवादी पक्षाने याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने सोमवारी चौकी हटविण्यात आली.