दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची, मागील तीन महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत व या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृति समिती यांनी सोमवार, १० ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करावे, असे जाहीर आवाहन प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, आर. के.पोवार व सर्वपक्षीय प्रमुखांनी केले आहे.
या मागणीसाठी प्रथम १३ जुलै रोजी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये, कांही ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये व मुंबईसह अनेक महापालिका क्षेत्रात झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलांमध्ये २० ते ३० टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तथापी ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही, तर उलट आजच्या करोना सद्यस्थितीत त्यांच्या अडचणींवर आणि दुःखावर मीठ चोळणारी असल्याचे सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा- राजू शेट्टी फडणवीस यांच्या गोटात होते, तेव्हा ते सरकारी नव्हते काय? – शिवसेना
राज्यातील ८० टक्के हून अधिक वीज ग्राहकांची धड खायला नाही, अशी भ्रांत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण वीज बिल माफी करावी, अशी वीज ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे. त्यामुळे हे तीन महिन्यांचे वीज बिल ग्राहक भरणार नाहीत असा निर्धार व जाहीर आवाहन या बैठकीद्वारे एकमताने करण्यात आलेले आहे. तसेच उर्जामंत्री यांनी जाहीर केलेल्या “दरमहा १०० युनिटसच्या आतील ग्राहकांना मोफत वीज” या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी अशीही मागणी करण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला आहे.
शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निलोफर आजरेकर या होत्या. या बैठकीमध्ये राजू शेट्टी, आमदार चंद्रकांत जाधव, प्रताप होगाडे, महेश जाधव, बजरंग पाटील, आर. के. पोवार, बाबा पार्टे, विजय सुर्यवंशी, चंद्रकांत यादव, बाबा इंदुलकर, अॅड. रणजित गावडे, महादेवराव आडगुळे, बाबासाहेब देवकर, भारत पाटील, दिलीप देसाई, राजेंद्र सुर्यवंशी, संदीप कवाळे, अॅड. राजेंद्र पाटील, विक्रांत पाटील किणीकर, समीर पाटील, विक्रम जरग, मारुतराव कातवरे आदी अनेक मान्यवर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 2:16 pm