राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज (शनिवार) येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महापूजा केली. राज्यात पुरेसा पाऊस पडू देत, मुक्‍या जनावरांना विपुल प्रमाणात चारा उपलब्ध होऊ दे आणि सर्व शेतक-यांसह जनतेला सुखी ठेव  असे साकडे त्यांनी महापूजेच्या निमित्ताने घातले. आषाढी एकादशीची श्री विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. मात्र, अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त असल्याने यंदा कार्तिकीची महापूजा करण्याचा मान पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे व त्यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांना मिळाला. तसेच, पालकमंत्र्य़ांसोबत पूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्‍यातील धुंदवडे गावातील धर्मा विठू कांबळे (वय ४५) आणि रंजना धर्मा कांबळे (वय ४०) या वारकरी दांम्पत्याला मिळाला.
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते लक्ष्मणराव ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला. पंढरपूरला येणा-या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने अनेक प्रकारची विकास कामे हाती घेतली असून, आगामी काळात ही कामे अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्‍वास ढोबळे यांनी व्यक्त केला.
गेली पाच वर्षे आषाढी वारीला जाणारे धर्मा कांबळे म्हणाले, देवाने आज महापूजेला उपस्थित राहण्याची संधी दिली. त्यामुळे यापुढेही पंढरीची वारी दरवर्षी घडू दे असे मागणे विठ्ठलाकडे मागितले आहे.
दरम्यान कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागेत स्नान करण्याची पर्वणी साधण्यासाठी सुमारे चार लाखाहून अधिक भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत.