कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असताना नितीन साठे या दलित तरुणाचा खून झाल्याप्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शंकर ढोकले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज, गुरुवारी न्यायालयाने फेटाळला. जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी याबाबतचा आदेश दिला. अर्जाला विरोध करताना साठे याचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्यानंतर ढोकले यांनी स्टेशन डायरीत खोटय़ा नोंदी केल्याचा आक्षेप सरकारी वकिलांनी घेतला.
सुमारे अडीच महिन्यांपूर्वी कोतवाली पोलिसांनी नितीन ऊर्फ बाळू भाऊ साठे (२८, रा. जवळा, पारनेर) या तरुणाला संशयित म्हणून बेकायदा ताब्यात घेतले होते. १२ जुलैच्या सायंकाळी त्याचा पोलिसांच्या ताब्यात असतानाच मृत्यू झाला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ढोकले यांच्यासह उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे तसेच पोलीस कर्मचारी संजय डाळिंबकर, सादिक शेख, हेमंत खंडागळे, संदीप शिंदे या सहा जणांविरुद्ध साठे याचा मारहाणीत खून केल्याचा व पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. या सहाही जणांना निलंबित करण्यात आले आहे.
सीआयडीने अद्यापि या गुन्हय़ात कोणाला अटक केलेली नाही. दरम्यान, या गुन्हय़ात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी ढोकले व निमसे या दोघांनी अर्ज दाखल केला होता. त्यातील ढोकले यांच्या अर्जावर सुनावणी झाली. ढोकले यांच्या वतीने युक्तिवाद करताना वकील हर्षद निंबाळकर यांनी सांगितले, की साठे याच्या मृत्यूवेळी ते पोलीस ठाण्यात हजर नव्हते. त्याच्या तपासासाठी स्वतंत्र अधिकारी होता. त्या वेळी ढोकले यांना पोलीस अधीक्षकांनी वाहतूक नियंत्रणासाठी पाठवले होते.
सीआयडीच्या वतीने युक्तिवाद करताना जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी अटकपूर्व जामिनाला जोरदार विरोध केला. पोलीस ठाण्याचा प्रमुख म्हणून ढोकले यांचीच जबाबदारी होती. साठे याला मारहाण झाली तेव्हा ढोकले ठाण्यातच उपस्थित होते. साठे अत्यवस्थ झाल्याचे पोलिसांनी त्यांच्या निदर्शनास आणले होते, परंतु त्यांनी वेळेत उपचारासाठी पाठवले नाही. जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी साठेला पुण्याला हलवण्यास सांगितले होते, मात्र तरीही साठे याला पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.
नितीन साठे याची आई संगीता यांच्या वतीने वकील निर्मला चौधरी यांनी युक्तिवाद केला. दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या उत्तरीय तपासणीत नितीनला २९ बाहय़ व ३ अंतर्गत जखमा झाल्याचे आढळले व मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल आहे. पोलिसांनी साठेला ताब्यात घेतल्याची कोणतीही माहिती कुटुंबाला दिली नव्हती.