भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज शरद पवारांचा वाढदिवस असून हेच औचित्य साधत अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईत दुपारी १२.३० वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. धुळ्याचे भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एप्रिल महिन्यात पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता.

धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी स्वपक्षाविरोधात आणि भामरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. त्याचवेळी ते भाजपा सोडतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी एप्रिलमध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता. अनिल गोटे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तर आमदारकीचा राजीनामा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला होता.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपातर्फे विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार अनिल गोटे यांना भाषण करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. यावेळी अनिल गोटे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ केला होता. अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती. हा वाद चांगलाच वाढला आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली. या गोंधळामुळे गोटे यांना न बोलताच मेळाव्यातून बाहेर पडावे लागले होते. भाजपतर्फे विजय संकल्प कार्यकर्ता मेळाव्यातील प्रसंगानंतर अनिल गोटे यांनी धुळ्याच्या महापौरपदावर दावा ठोकला होता. धुळे महापालिकेतही गोटे यांना यश मिळाले नव्हते.