नागपूर येथील भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदरकीचा राजीनामा दिल्यानंतर महिनाभरात अनिल गोटे यांनी राजीनामा देणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार १९ नोव्हेंबर रोजी अनिल गोटे आमदाराकीचा राजीनामा देणार आहेत. महिनाभरात दुसऱ्या आमदाराच्या राजीनाम्यामुळे भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. पुढील वर्षी राज्यभरात निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वीच पक्ष सोडून आमदार जात आहेत.

दोन दिवसांपूर्वी धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार अनिल गोटे यांना भाषण करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. यावेळी अनिल गोटे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ केला. अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, हा वाद चांगलाच वाढला आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली. या गोंधळामुळे गोटे यांना न बोलताच मेळाव्यातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा देणार असल्याचे सांगितल्यामुळे राजकीय गोटात चर्चेला उधान आले आहे.

भाजपतर्फे विजय संकल्प कार्यकर्ता मेळाव्यातील प्रसंगानंतर अनिल गोटे यांनी धुळ्याच्या महापौरपदावर दावा ठोकला होता. अखेर आज त्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. १९ तारखेला अनिल गोटे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. भाजप त्यांचा राजीनामा स्विकारतो हे पाहण्याचं ठरणार आहे.