जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षमपणे प्रयत्न करीत आहे. आरोग्य तपासणीसाठी व्यापक मोहीम हाती घेतल्याने रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी. करोनाची प्रारंभिक लक्षणे आढळून आल्यास तत्काळ रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या ५६२ पर्यंत गेली आहे. या पार्श्वभूमीवर यादव यांनी करोनाचे रुग्ण योग्य वेळेत शोधून त्यांच्यावर वेळीच औषधोपचार झाल्यास मृत्यूदर  कमी होऊ शकेल, असे सांगितले. मृत्यू झालेल्या ४८ पैकी ११ रुग्णांना अन्य आजार असल्याचे वैद्यकीय विश्लेषणातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांवर योग्य वेळेत उपचार होवून मृत्यूदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात आरोग्य तपासणीची मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेत रोज सरासरी ३०० नमुन्यांची तपासणी होत आहे. टाळेबंदीत जिल्ह्य़ात आलेल्यांमध्ये काही जण करोनाबाधित होते. त्यांच्या संपर्कात आल्याने करोना रुग्णांची संख्या वाढली. असे असले, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. करोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारासाठी आरोग्य विभाग सक्षम आहे. नागरिकांनी या विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसून येताच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

पथ्यांचे पालन न करणाऱ्यांविरूध्द कारवाईचे निर्देश

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे, तर ग्रामीण भागात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ४५ वर्षांंवरील ज्या नागरिकांना रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण अधिक आहे, अशा नागरिकांची तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. करोनाविरोधातील पथ्यांचे पालन न करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.