16 December 2019

News Flash

अपेक्षित पाऊस न पडल्याने धुळ्यातील बळीराजा चिंताग्रस्त

या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस असताना धुळे जिल्ह्यात मात्र अपेक्षीत पाऊस अद्यापही झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत जेमतेम ४८ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ८९ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, पेरण्यांमध्ये शिरपूर शिंदखेडा तालुका आघाडीवर आहे. दरम्यान, अद्यापही दमदार पाऊस झालेला नसल्याने अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. अपेक्षित पाऊस न पडल्याने धुळ्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत २५०.७५ मिलिमीटर पाऊस झाला. हे प्रमाण सरासरीच्या सुमारे ४८ टक्के आहे. अनेक भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस अधूनमधून होत असल्याने शंभर टक्के पेरण्या झालेल्या नाहीत.

जिल्ह्यात आतापर्यंत ८९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा खरीप हंगामात चार लाख ५८ हजार ३०० हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत धुळे जिल्ह्यात चार लाख नऊ हजार ९८४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात शिरपूर तालुक्यात शंभर टक्के क्षेत्रावर तर शिंदखेडा तालुक्यात ९६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. साक्री तालुक्यात प्रत्येकी ८९ टक्के पेरण्या झाल्या असून, पाऊस लांबल्याने कडधान्य, तृणधान्य गळीत धान्याचा पेरा कमी झाला आहे. दुसरीकडे कपाशीची लागवड वाढली आहे. यंदा पेरण्यांना उशीर झाल्याने उत्पन्नात घट येणार आहे. दरम्यान, अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही.

जिल्ह्यातील मालनगाव, करवंद, सुलवाडे प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये पाण्याची कमतरता आहे. अद्यापही अकरा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. धुळे तालुक्यातील कुंडाणे तांडा, अजंग, साक्री तालुक्यातील कढरे, पेरेजपूर, हट्टी बु., शिंदखेडा तालुक्यातील निशाणे, तामथरे, डाबली-धांदरणे, कामपूर येथील टँकर बंद करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत शिंदखेडा तालुक्यातील वारूड, पथारे, दत्ताणे, अजंदे, भडणे, मेलाणे, विटाई, चांदगड, चुडाणे, वरुळ घुसरे तर साक्री तालुक्यातील कढरे या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.⁠⁠⁠⁠

First Published on July 25, 2017 6:13 pm

Web Title: dhule district farmer worried about rain
Just Now!
X