धुळे आणि महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरवणाऱ्या मेसेजमधील व्हिडिओसंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. जनजागृतीसाठी तयार केलेल्या  एका व्हिडिओचा अफवा पसरवण्यासाठी गैरवापर केल्याचे समोर आले आहे. तर अन्य दोन व्हिडिओंमधील माहिती देखील अर्धवट आहे. या तीन व्हिडिओंमुळेच महाराष्ट्रात जमावाकडून मारहाण झाल्याने ९ जणांना जीव गमवावा लागला.

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून धुळ्यात जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांना जीव गमवावा लागला. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून व्हॉट्स अॅपवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर लगाम लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धुळे आणि अन्य भागांमध्ये व्हॉट्स अॅपवर तीन व्हिडिओ शेअर केले जात होते. या तीन व्हिडिओंची पोलिसांनी सत्यता पडताळून बघितली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंचा अफवा पसरवण्यासाठी गैरवापर केल्याचे स्पष्ट होते, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

पहिल्या व्हिडिओचे सत्य?

पहिल्या व्हिडिओत दुचाकीवरुन दोन तरुण येतात आणि एका मुलाला पळवून नेतात, असे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ देशाच्या अन्य भागांमध्येही व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ भारतातील नसून तो व्हिडिओ पाकिस्तानमधील कराचीतील एका सामाजिक संस्थेने जनजागृतीसाठी २०१६ मध्ये तयार केला होता. बेपत्ता मुलांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. ‘रोशनी हेल्पलाईन’ या सामाजिक संस्थेने ‘स्पेक्ट्रम वाय अँड आर’ या कंपनीकडून तो व्हिडिओ तयार करुन घेतला होता. इंडियन एक्स्प्रेसने या सामाजिक संस्थेशी ईमेलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी व्हिडिओच्या उद्देशाबाबत माहिती दिली. ‘कराचीतून दरवर्षी ३ हजार मुले बेपत्ता होतात. हा व्हिडिओ आम्ही जनजागृतीसाठी तयार केला होता. या व्हिडिओमुळे दहा मुलांची पुन्हा कुटुंबियांशी भेट घडवणे शक्य झाले होते. या व्हिडिओचा गैरवापर होणे ही दुर्दैवी बाब आहे. भारतात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत महत्त्वाच्या दृश्यांवर कात्री लावण्यात आल्याचे संस्थेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. भारतात आणि पाकिस्तानमध्ये लहान मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनकच आहे. मात्र, जनजागृतीसाठी तयार केलेल्या या व्हिडिओचा गैरवापर करु नये, असे संस्थेच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

मूळ व्हिडिओत काय दाखवण्यात आले होते?
मूळ व्हिडिओत सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज दाखवण्यात आले होते. यात रस्त्यालगत काही मुले खेळताना दाखवण्यात आली होती. दुचाकीवरुन दोन तरुण येतात आणि यातील एका मुलाला पळवून नेतात. काही वेळाने दोघेही तरुण त्या मुलाला घेऊन परत येतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दिशेने हातातील फलक दाखवतात. यमध्ये ‘तुमच्या मुलांचे अपहरण करण्यासाठी काही सेकंदही पुरेशी असतात. कराचीत दरवर्षी ३ हजार मुलं बेपत्ता होतात. त्यामुळे तुमच्या मुलांकडे लक्ष द्या’, असे संदेश या व्हिडिओतून देण्यात आला होता.

दुसऱ्या व्हिडिओ काय दाखवण्यात आले?
दुसऱ्या व्हिडिओत बुरखाधारी महिला आणि तिच्या मागून जाणारा लहान मुलगा असे दाखवण्यात आले आहे. नंदुरबारमध्ये या महिलेने मुलाचे अपहरण केले, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ती अपहरणाची घटनाच नाही. हा व्हिडिओ बेंगळुरुचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

तिसऱ्या व्हिडिओचे व्हायरल वास्तव
जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिर्डीत एक व्यक्ती लहान मुलाला घेऊन जाताना दाखवण्यात आले आहे. हा मुलगा काही वेळाने पत्रकारांना सांगतो की, त्याचे बुलढाण्यातून अपहरण करण्यात आले. मात्र, या व्हिडिओतील माहिती अर्धवट आहे. प्रत्यक्षात हा मुलगा त्याच्या परिचयातील व्यक्तीसोबतच बुलढाण्यावरुन शिर्डीला आला होता. स्वेच्छेनेच तो आला होता आणि त्याच्या कुटुंबियांनी त्या व्यक्तीकडून पैसे उधारीवर घेतले होते. म्हणूनच त्याने अपहरण केल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती.