शहरातील स्टेट बँकेच्या कोषागार शाखेत पैसे भरण्यासाठी आलेल्या दोन काश्मिरी युवकांना पोलिसांनी सोमवारी संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रमजान महिन्यात आपण भिक्षुकीसाठी धुळ्यात आलो असल्याचे या संशयितांचे म्हणणे आहे. कोषागार शाखेत उत्फत हुसेन नजीर हुसेन (२२) आणि गुलजार हुसेन फय्याद हुसेन गुर्जर (३२) हे दोघे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोन्ही युवक काश्मीरमधील गुंज तालुक्यातील सुरनकोटजवळील डोडी येथील रहिवासी आहेत. संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांकडे मतदार ओळखपत्र आढळून आले. दोन्ही संशयितांनी त्यांच्या मूळ रहिवास प्रांतातील दिलेल्या ओळखीची शहानिशा करण्यात येत आहे. हे दोघे जण मौलवीगंज भागातील एका प्रार्थनास्थळात राहात आहेत. आपण याआधी मालेगाव आणि नांदेड येथेही भिक्षुकी केली असून भिक्षुकीतून मिळालेली रक्कम आपण खात्यात जमा करण्यासाठी आलो होतो, असे त्यांचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 2:40 am