अत्याचार पीडित महिला पोलिसाची फिर्याद घेण्यास शिर्डी पोलिसांनी टाळाटाळ केल्याने अखेर या महिला पोलिसाची धुळे येथील आझादनगर पोलिसांनी फिर्याद दाखल करून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ठाणे जिल्हा पोलीस दलात असलेल्या महिलेला मोबाइलमधील फोटो दाखून बदनामी करील अशी धमकी देऊन तिच्यावर शिर्डी येथे वारंवार बलात्कार करण्यात आला या प्रकरणी आझादनगर धुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापूर्वी ही तक्रार घेऊन धुळे येथील आझादनगर पोलीस ठाण्याचे एक पथक शिर्डी पोलीस स्थानकाकडे तपासाच्या संदर्भात आले होते परंतु शिर्डी पोलिसांनी सदर घटना आमच्याकडे घडली नाही असे नेहमीच्या शैलीत उत्तर देत तपास कामात असहकार्य केल्याने सदर पथक पुन्हा धुळे येथे माघारी गेल्यावर त्यांनी अत्याचारीत महिला पोलिसाच्या फिर्यादीवरून मोहीत प्रकाश देसले (रा.विंचूर जिल्हा नाशिक ) या तरुणांविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

याविषयी २५ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार आझादनगर धुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात आपल्या नातेवाइकांच्या समवेत ती दवाखान्यात गेली होती त्यावेळी तिची ओळख मोहित प्रकाश देसले (रा.विंचूर) याच्याशी झाली. मत्री झाल्यानंतर एक दिवस मोहितसोबत ड्रेस खरेदी करण्यासाठी गेली. त्यावेळी मोहितने मोबाइलमधून फोटो घेतले. या कालावधीत संबंधित महिलेचा विवाह झाला. त्यानंतर मोहितने माझाकडे असलेले फोटो तुझ्या पतीला दाखवेल अशी धमकी देण्यास सुरुवात केली तसेच वारंवार शिर्डी येथे बोलावून लॉजमध्ये बलात्कार केला. जर कोणाला सांगितले तर मी तुझी बदनामी करेल अशी धमकी तो तिला वारंवार देत होता. या दरम्यान ही महिला पोलीस खात्यात भरती झाली परंतु मोहितकडून तिचा छळ सुरूच होता. याच प्रकारातून मोहितने महिलेच्या पतीला फोटो पाठविले. परिणामी सासरच्या मंडळीने तिला घराबाहेर हाकलले. सदरचा होणारा हा त्रास मार्च २०१४ पासून तिला हा सुरू होता. तिने सर्व परिस्थिती धुळे पोलिसांना सांगितली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अधिक माहिती देताना धुळे येथील आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार म्हणाले की सदरची घटना शिर्डीला घडली असल्याने नियमानुसार हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यासाठी धुळे येथील काही पोलीस शिर्डीला आले होते. मात्र शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी सदरची घटना जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली व सदरच्या घटनेची सुरुवात धुळे येथे झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपास व चौकशी धुळे पोलिसांनी करावी असे उत्तर पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी संबंधित पोलीस पथकाला दिल्याची माहिती आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सांगितले.

शिर्डी पोलिसांची टाळाटाळ

शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक लॉजेस अनधिकृतपणे चालू असून त्यामध्ये अनेक गोरखधंदे सर्रासपणेपणे चालतात. अनेक घटना शिर्डीत घडतात. त्याच्या तपासासाठी बाहेर जिल्ह्यातील तसेच परराज्यातील अनेक पोलीस पथके तपासासाठी शिर्डीत येतात परंतु शिर्डी पोलीस त्यांना सहकार्य करीत नाही. जादा गुन्हेगारी घटनांची नोंद दप्तरी होऊ नये म्हणून शिर्डी पोलीस अनेक गुन्हे दाखल करून घेत नाही, अशा अनेक घटनांचा दस्तुरखुद्द पोलिसांनाच अनुभव येत असल्याने सर्वसामान्य भक्तांचे मात्र हाल होताना दिसतात.