जिल्ह्यातील सर्वच कोविड केअर केंद्रांमध्ये असलेल्या असुविधांविषयी रुग्णांसह नातेवाईकांची प्रचंड ओरड होत आहे. या सर्वच केंद्रांमध्ये जवळपास कमी-अधिक प्रमाणात सारख्याच समस्या आहेत. त्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी महामार्गावरील बाफणा आयुर्वेद महाविद्यालयात कोविड केअर केंद्रात सुविधा करण्यात आली आहे. त्या ठिकाणी तुंबलेली स्वच्छता गृहे, अपूर्ण खाटांची संख्या, अस्वच्छ चादरी, आजूबाजूला साचलेला कचरा, बेचव जेवण, साधी विचारपूसही नाही, अशा अनेक समस्यांमुळे रुग्णांसह नातेवाईक हैराण झाले आहेत.  त्यामुळेच या केंद्रांमधून आता करोनाचे रुग्ण पलायन करु लागले आहेत. वैद्यकीय यंत्रणांना धमकावले जात आहे. केंद्रांवर दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. यावर तातडीने सर्वच केंद्रांमध्ये स्वच्छता आणि आवश्यक उपाय योजना केल्यास परिस्थिती सुधारु शकेल, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

धुळे शहरासह ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव गतीने वाढत आहे. यामुळे करोना बाधीत रुग्णांना बाफणा आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड केअर केंद्रांमध्ये ठेवण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी ३२ करोना बाधीत आणि विलगीकरण केलेले ४७ जण आहेत. या ठिकाणी केंद्रांमध्ये अस्वच्छता, जेवणाची गुणवत्ता, दुर्गंधी यासह अनेक समस्या आहेत. यामुळे रुग्णांच्या नातलगांचा संयम सुटत आहे. या केंद्रांवर दगडफेकीचे व रुग्ण पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. करोना रुग्ण आणि विलगीकरणातील नातेवाईक आता हिंसक का होऊ लागले आहेत, असा प्रश्न पडत आहे. या प्रकरणी रुग्णांसह १५ जणांविरुध्द गुन्हाही दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका केंद्रातील गलथान कारभाराविषयी समाज माध्यमात ओरड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: त्या ठिकाणी भेट देऊन प्रशासनाला महत्वपूर्ण सुचना दिल्या होत्या. मात्र, त्याचा म्हणावा तितकासा फरक पडला नाही. कारण, इतर कोविड केंअर केंद्रामध्ये अनेक समस्या आहेत. यात सर्वात जटील समस्या अस्वच्छतेची आहे. सफाई कर्मचारीच काम करायला तयार नसल्याने दवाखान्यातील डॉक्टर, परिचारिका हतबल झाल्या आहेत.

केवळ ज्या संशयितांमध्ये करोनाची लक्षणे आहेत, त्यांनाच बाफणा आयुर्वेद महाविद्यालयात भरती करायला हवे. कोविड सेंटरमध्ये जनावरांसारखे माणसे कोंबली जात असून  त्या ठिकाणी रुग्णांचा जीव गुदमरतो आहे.

या केंद्रांमध्ये पुर्णत: असुविधा असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. याबाबत जिल्हा व मनपा प्रशासनाने लक्ष घालून समस्या सोडवाव्यात व आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांनी केली आहे.

ग्रामस्थांनी तक्रारी केल्याने पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील आणि युवा नेते विशाल सैंदाणे यांनी बाफणा आयुर्वेद महाविद्यालयातील केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तेथे परिसरात कुजलेले अन्न, हातमोजे, पीपीई किट आवारात पडलेले, तुंबलेले भांडे, कक्षात जमलेला कचरा, अस्वच्छ चादरी अशी दुरावस्था कोविड केंद्रात होती, अशी माहिती पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शिवाय, तातडीने प्रशासनाने ही परिस्थिती सुधारावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.