धुळे येथील राजस्थान लॉजमध्ये सोमवारी रात्री झालेल्या महिलेच्या खूनाचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले असून याप्रकरणी नितीन पाटील (वय ३४) यास पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी शहरातील आग्रा रोडवरील खंडेराव बाजार चौकात असलेल्या राजस्थान लॉजिंगमध्ये पती-पत्नी असल्याची नोंद करीत एक दाम्पत्य मुक्कामासाठी थांबले. लग्न सोहळ्याच्या निमित्ताने धुळ्यात आल्याचे कारण  त्यांनी दिले होते. खोली नोंदणीसाठी सुरेश निळे या नावाने असलेल्या वाहन परवान्याची झेरॉक्स लॉ़ज चालकाला दिली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित औषध घेऊन येण्याचे कारण देत बाहेर पडला. काही वेळाने लॉज मालकाला खोली नंबर १०१ चा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी डोकावले असता महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या मानेवर, छातीवर, गळ्यावर जखमा दिसल्या. त्यांनी त्वरीत पोलिसांना माहिती दिली. अभिषेक गिंदोडीया यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी लॉजच्या नोंदवहीत असलेल्या सुरेश निळे या व्यक्तीची माहिती घेणे सुरू केले. त्यानुसार वरखेडी येथून सुरेश निळे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तो रिक्षाचालक असल्याचे समजले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास पारोळा चौफुली येथून एक युगूल लग्नानिमित्त धुळ्याला आलो असल्याचे सांगून रिक्षात बसले होते, असे रिक्षाचालक निळेने सांगितले. त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने आपले ओळखपत्र त्यांनी मागून घेतले. शहरातील तीन ते चार लॉजमध्ये चौकशी केल्यावर अखेर राजस्थान लॉजमध्ये त्यांना खोली मिळाल्याची माहिती सुरेश निळे यांनी पोलिसांना दिली.

तपासादरम्यान पोलिसांना मयत महिलेजवळ मिळालेल्या मोबाइलवरून तिचे नाव आणि सोबतच्या व्यक्तीचे नाव मिळाले. संशयित नितीन पाटील हा जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यावरुन पथकाने रात्रीच नितीन पाटीलला अटक केली. त्याने प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule woman murdered at lodge extra marital affair one arrested
First published on: 20-02-2019 at 14:31 IST