धूलिवंदनाच्या दिवशी विडा गावात एका जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा निजामकालापासूनची आहे. दरवर्षी होळीची चाहूल लागताच गावातील व आसपासचे जावई आपला नंबर लागू नये, म्हणून पसार होतात. मात्र, गावातील तरुण नजर ठेवून एका जावयाला गळाला लावून परंपरा कायम ठेवतात. या जावयाचा गावकऱ्यांकडून नवे कपडे देऊन सन्मानही केला जातो.
या वर्षी खंडूराव घोरपडे यांचे जावई, ६० वर्षीय बारीकराव भोसले यांची गर्दभ सवारी निघाली. मागील काही वर्षांपासून ही सवारी पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. विडा (तालुका केज) या ६ हजार लोकवस्तीच्या गावात धूलिवंदनाच्या दिवशी निजामकाळापासून सुरू झालेली जावयाच्या गर्दभ सवारीची परंपरा आजही कायम आहे.
निजामाच्या काळात जहागीरदार असलेले अनंतराव देशमुख यांचे जावई एकदा धूलिवंदनासाठी गावात आले. त्यांची त्या वेळी गर्दभ सवारी निघाली, तेव्हापासून गावात दरवर्षी एका जावयाचा हा मान करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. होळीच्या सणाची चाहूल लागताच गावात असलेले व आसपासच्या खेडय़ातील जावईबापू गायब होतात. मात्र, उत्साही तरुण परंपरा कायम ठेवण्यासाठी एखाद्या जावयाला पकडतात. सासरवाडीकरांचा मान म्हणून पकडलेला जावई ही गर्दभ सवारी आनंदाने स्वीकारतो. वाजतगाजत मिरवणुकीनंतर गावातील मारुतीच्या मंदिरावर गावकऱ्यांच्या वर्गणीतून आणलेले नवे कपडे देऊन या जावईबापूंचा सन्मान केला जातो. यंदा गावातील खंडूराव घोरपडे यांचे जावई बारीकराव भोसले (वय ६०, बुरंडवाडी) यांना हा मान मिळाला. प्रत्यक्षात गावचा नवा जावई शोधण्यास विडय़ाचे तरुण गेले होते. मात्र, अपेक्षित जावई गायब झाल्याने भोसले यांना पकडून आणण्यात आले. ज्या गाढवावरून मिरवणूक काढली जाते, त्याला पूर्ण रंगवून गळ्यात चपलांचा हार टाकला जातो. जावयालाही रंगवून वाजतगाजत मिरवणूक काढण्याचीही प्रथा विडेकरांनी जपली आहे. काही वर्षांपासून या प्रथेला प्रसिद्धी मिळू लागल्याने दरवर्षी माध्यम प्रतिनिधी व आसपासचे लोक गावात कोणत्या जावयाला हा मान मिळतो, ते पाहण्यास गर्दी करतात.
पकडून आणण्याची परंपरा!
निजामकाळापासून सुरू झालेल्या जावयाच्या गर्दभ सवारी परंपरेत गावातील विविध जाती-धर्माच्या जावयांना पकडून ही परंपरा कायम ठेवली गेली. यात कधीही वाद झाला नाही. जावई हा मान आपल्याला मिळू नये, या साठी गायब होत असले, तरी एकदा गटल्यानंतर मात्र गावकऱ्यांचा बहुमान आनंदाने स्वीकारतात. आतापर्यंत स्वतहून एकाच जावयाने सवारी करून घेतली, तर एक वेळ सासरा व जावई दोघांची सवारी होण्याचा योग आला होता. मात्र, जावयांना पकडून आणण्याचीच परंपरा कायम असल्याचे दत्ता देशमुख यांनी सांगितले.