पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा दावा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला होता. तसेच आता आपल्याला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोपही त्यांच्यातर्फे करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते तर त्यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

रश्मी शुक्लांच्या वकीलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र फोन टॅपिंगसाठी दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या असेही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना त्या काळातील खासदार, नेते यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे. ज्यापध्दतीने त्या त्यांची बदली झालेली सांगत आहेत मात्र त्यांची बदली झालेली नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

‘फोन टॅपिंग’साठी शुक्ला यांनी तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची परवानगी घेतली होती. याबाबत सादर केलेल्या अहवालाची कुंटे यांनी दखल घेतली होती. तसेच त्यांनी शासनाला दिलेल्या अहवालात परवानगीविषयी नमूद केले होते. नंतर मात्र त्यांनी या प्रकरणी दिशाभूल केली, असा दावा शुक्ला यांच्यातर्फे कोर्टात करण्यात आला.

गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शुक्ला यांनी अटकेपासून दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असताना पोलिस महासंचालकांनी काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या फोनवरील संभाषणावर पाळत ठेवण्याचे आदेश दिल्याचा दावा शुक्ला यांच्यातर्फे करण्यात आला. बदल्या व नियुक्त्यांतील भ्रष्टाचारात गुंतलेल्या आणि राजकीय संबंध असलेल्या दलालांच्या संभाषणाचा त्यात समावेश होता. त्यामुळे शुक्ला या केवळ आपल्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत होत्या, असा दावाही शुक्ला यांचे वकील अ‍ॅड महेश जेठमलानी यांनी केला.